Ad will apear here
Next
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह)
वेरूळ येथील कैलास मंदिर (लेणे)

रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
.......
‘नाट्यसंजीवनी’च्या माध्यमातून आपल्याबरोबर सांगीतिक संवाद साधत असताना, रोज आणखी काहींबरोबर संवाद साधत होतो. त्यांचे प्रश्न अनेक होते; पण त्यात एक प्रश्न कॉमन होता. 

‘आमची एंट्री केव्हा?’

मी त्यांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकणारे नव्हते. 

स्वाभिमानी, गुणसंपन्न, देखणे, मनस्वी कलाकार, रसिक, राजकारणधुरंदर, नवनिर्मितीचा ध्यास घेणारे आणि त्याच्या पूर्णत्वासाठी धडपडणारे, नृत्यनिपुण अशा गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध असे सगळे होते. महाराज दंतिदुर्ग, राणी घृष्णावती, राणी माणकावती, आचार्य गुणनिधी, विशालाक्ष, सीमंतिनी, दुमार असे सगळेच माझ्याबरोबर संवाद साधत होते. 

खरं सांगायचं तर हा संवाद केव्हाच सुरू झाला होता. खूप वर्षांपूर्वी. वेगवेगळ्या कारणांनी वेरुळचं कैलास लेणं जवळपास तीनदा पाहून झालं होतं. अखंड अशा एका पाषाणात कोरलेलं ते भव्यदिव्य शिवमंदिर, त्यामधील खांबाखांबात कोरलेला सांस्कृतिक इतिहास, त्याच्याशी निगडित अनेक कथा, दंतकथा, जवळच असलेलं घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर, तेथील पुष्करिणीचा इतिहास, शेकडो वर्षांच्या संघर्षांची ऐतिहासिक पानं... या सगळ्यांनी भुरळ घातली होती. जिज्ञासा चाळवली होती. 

मग सुरू केला अभ्यास. काहीकाही अंधुक हाती येऊ लागलं होतं. काही संदर्भ निसटले होते. इतिहासाची काही पानं लुप्त झाली होती. मग दुवे जुळवण्याचा उद्योग सुरू केला. 

महाराज दंतिदुर्ग महापराक्रमी. कलासक्त. गुणग्राहक. दानशूर. त्यांच्या काळात चौदा विद्या, चौसष्ट कला सर्वांगानं बहरल्या होत्या. मोठी राणी घृष्णावती सात्विक वृत्तीची, तर राणी माणकावती नृत्यनिपुण. त्यामुळे संघर्ष तर असणारच. निमित्त लहानग्या राजपुत्राचं पण संघर्ष विकोपाला, त्यातून मोठ्या राणीची माघार, पण एका वेगळ्या अटीवर. स्वयंभू शंकराचं भव्य मंदिर व्हावं. तसं ते होतं आणि त्या राणीच्या नावानं घृष्णेश्वर म्हणून प्रसिद्ध होतं. जळफळाट तर होणारच. मग माणकावतीला एका अखंड पाषाणात खोदलेलं मंदिर हवंसं वाटू लागतं. आणि दुमार नावाचा कारागीर ते बांधतो; पण मध्ये असं काही घडतं की राणी माणकावतीच्या नावानं होणारं मंदिर कैलास लेणं म्हणून प्रसिद्ध होतं. 

अशी कथा. 

अर्थात त्यात अनेक उपकथानकं आहेत. खऱ्या ऐश्वर्याची चर्चा आहे. आयुष्यात संपत्ती महत्त्वाची, राज्य महत्त्वाचं, भावना महत्त्वाच्या, नाती महत्त्वाची, प्रसिद्धी महत्त्वाची, हाव महत्त्वाची की माणुसकी महत्त्वाची याबद्दल चर्चा आहे. 

हे कथानक आकाराला येऊ लागलं आणि त्याच नावसुद्धा सुचलं, संगीत ऐश्वर्यवती. नेहमीप्रमाणे यात वेगळेपण जपलं होतं. नाटकात नृत्य होतं, संगीत होतं आणि शेवटच्या अंकात अखंड पाषाणावर कोरलेल्या कैलासलेण्याची रेखाकृती मोठ्या पडद्यावर साकारलेली पाहायला मिळत होती. ‘खल्वायन’ने नाटकाची चांगली निर्मिती केली होती. त्यामुळे त्या नाटकातील पात्रांनी एंट्री केव्हा घेऊ असं मला विचारणं स्वाभाविक होतं. मी त्यांना पुढच्या पर्वापर्यंत थांबायला सांगितलं आहे. 

केवळ ‘ऐश्वर्यवती’च नव्हे तर नात्यांचा शोध घेणाऱ्या, मध्ययुगीन भारतातील एका कथानकावर आधारित ‘संगीत ऋणानुबंध,’ संत चोखामेळा यांचे जीवनचरित्र मांडणारे ‘संगीत चोखामेळा,’ तानसेनच्या जीवनावरील ‘संगीत रागदरबारी’ या नाटकातील पात्रांनाही व्यक्त होण्यासाठी थांबवले आहे. 

एकूण आठ नाटकांतील १३० नाट्यपदे मी लिहिली आहेत. काही संगीतबद्ध झाली आहेत. काहीना संगीत देणं चालू आहे. जेवढी उपलब्ध होतील तेवढी रसिकांसमोर सादर करणार आहे; पण तूर्तास या पर्वात इथे थांबतो. 

माझ्या नाटकातील गाण्यांच्या आणखी काही क्लिप्स उपलब्ध झाल्या, की दुसऱ्या पर्वाला सुरुवात करणार आहे. आपण सर्वांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! सर्व संगीतकार, सर्व गायक, गायिका, साथसंगत करणारे सर्व कलाकार यांना मनःपूर्वक धन्यवाद!

आज पुन्हा एकदा ‘शांतिब्रह्म’मधील एक पद. 

गायिका : प्राजक्ता लेले
संगीत : विजय रानडे
ऑर्गन : वरद सोहनी
तबला : केदार लिंगायत

- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.

संपर्क : ९४२३८ ७५८०६

(नाट्यसंजीवनी या मालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://bit.ly/2XwoQN6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZAFCN
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग आठवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा आठवा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पाचवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा पाचवा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग सातवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा सातवा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग तिसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा तिसरा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language